महिलेची ऑनलाईन फसवणूक   

पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाच्या संधीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संदेश पाठविला होता. ऑनलाईन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. नामवंत हॉटेलची जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करून त्याला दर्शक पसंती मिळवून दिल्यास दररोज १ हजार ५०० ते सहा हजार रुपये मिळवा, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. 
 
चोरट्यांनी सुरुवातीला महिलेला एक काम दिले. महिलेने हे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांत महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी साडेनऊ लाख रुपये जमा केले. मात्र, चोरट्यांनी त्यांना कुठलाच परतावा दिला नाही. 
 

Related Articles